जळगाव- लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीत प्रमुख लढत होत आहे. राष्ट्रवादीकडून माजीमंत्री गुलाबराव देवकर तर भाजपकडून आमदार उन्मेष पाटील हे रिंगणात उतरले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या देखील रिंगणात आहेत. परंतु त्यांचे फारसे आव्हान असणार नाही. भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांची आधी दाखल केलेली उमेदवारी मागे घेऊन उन्मेष पाटलांना पुढे केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भाजपमधील अतंर्गत गटबाजी राष्ट्रवादीचे उमेदवार देवकर यांच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र आहे.
भाजपत उमेदवार बदलाचे वारे जोरात सुरू होते. मात्र, अखेर हा गोंधळ मिटला असून उन्मेष पाटील रिंगणात आहेत. त्यांना गुलाबराव देवकरांचे कडवे आव्हान असणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या दोन आठवडे आधीच राष्ट्रवादीने मतदारसंघ पिंजयला सुरुवात केली होती. भाजपनेही शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मिती केली होती.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले ए. टी. पाटील यांनी राज्यात विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. या विजयानंतर गेल्या पाच वर्षात जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विधानसभा, नगरपालिका, जळगाव महापालिका, पंचायत समित्या, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी दूध संघ, तालुका देखरेख संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण करण्याचा सपाटा लावला. भाजपला प्रतिकार करणाऱ्या शिवसेनेला काही ठिकाणी आपले अस्तित्व राखता आले आहे. मात्र, मागच्या पाच वर्षात मतदारसंघात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पूर्णत: सफाया झाला. या दोन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अस्तित्वही राखता आले नाही. या घडामोडींचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असल्याने दोघांनाही आपापल्या मित्रपक्षांना जागा वाटपानुसार गोंजारण्याशिवाय पर्याय नाही.
मंत्री महाजनांचा शब्द प्रमाण-
रावेर लोकसभा मतदारसंघात जसे आमदार एकनाथ खडसेंचे वलय आहे; अगदी तसेच वलय जळगाव मतदारसंघात मंत्री गिरीश महाजनांचे आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा धमाका करणारे महाजन यांचे सध्या राजकीय वजन वाढले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात आहे.
सन २०१४नंतर मतदारसंघनिहाय राजकीय स्थिती आणि राजकारण
१) जळगाव शहर
राजकीय स्थिती : कारागृहातून निवडणूक लढलेले शिवसेनेचे नेते सुरेश जैन हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. आमदार सुरेश भोळे यांच्या रूपाने भाजपने हा मतदारसंघ ताब्यात घेतला. महापालिकेवर असलेली जैन यांची सत्ता भाजपने उलथवली.
वर्चस्व : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. बहुतांश ग्रामपंचायती, विकास सोसायट्यांवर भाजपची सत्ता आहे. बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे.
राजकीय घडामोडी : शहर विधानसभा मतदारसंघ पाठोपाठ शिवसेनेची महापालिकेतील सत्ता गेली. भाजपने सत्ता मिळविलेली बाजार समिती सेनेने शेवटच्या वर्षात पुन्हा मिळवली.
२) धरणगाव
राजकीय स्थिती : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गुलाबराव देवकरांचा पराभव करीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी झाले होते. धरणगाव पालिका व पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आली.
वर्चस्व : विधानसभा मतदारसंघ, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेनेचे वर्चस्व.
राजकीय घडामोडी: शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागली. तर पराभूत झालेले गुलाबराव देवकर हे आता राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार झाले आहेत.
३) अमळनेर
राजकीय स्थिती : राष्ट्रवादी आणि भाजपला धक्का देत अपक्ष आमदार शिरीष चौधरी विजयी झाले. त्यांनी भाजपला समर्थन दिले. त्यांना शह देण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील नगरपालिकेतील आघाडीच्या सत्तेसह भाजपमध्ये दाखल झाले. बाजार समिती, पंचायत समितीवर भाजपचीच सत्ता आहे.
वर्चस्व : नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची सत्ता.
राजकीय घडामोडी : भाजपचे गेल्यावेळचे विधानसभेचे उमेदवार अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादीत दाखल. राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव पाटील नगरपालिकेतील सत्तेसह भाजपत दाखल. विद्यमान आमदार शिरीष चौधरी निवडून आल्यावर भाजपचे सहयोगी सदस्य झाले. भाजपच्या स्मिता वाघ यांची विधान परिषदेवर वर्णी लागली.
४) पाचोरा
राजकीय स्थिती : राष्ट्रवादी आणि भाजपला नेटाने प्रतिकार करीत शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांचा विधानसभेत विजय. नगरपालिका, बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेने राखल्या.
वर्चस्व : विधानसभा, बाजार समिती, नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता. पंचायत समितीवर भाजपची सत्ता. राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार.
राजकीय घडामोडी : यापूर्वी मैत्रीपूर्ण संबंध असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आमदार किशोर पाटील यांच्यात राजकीय मतभेद वाढले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे संबध विकोपाला गेले. खासदार ए. टी. पाटील यांच्याशी राजकीय संघर्ष पेटला. राष्ट्रवादीच्या नेत्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील भाजपत दाखल झाल्या.
५) भडगाव
राजकीय स्थिती : भडगावात शिवसेनेने नगरपालिका, ग्रामपंचायती, बाजार समिती, पंचायत समितीवर वर्चस्व राखले.
वर्चस्व : पंचायत समिती, पालिका, बाजार समितीवर शिवसेनेची सत्ता.
राजकीय घडामोडी : स्थानिक पदाधिकाऱ्यात राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब देशमुख भाजपत दाखल झाले.