जळगाव - नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी 60 दिवसांपासून दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकरी आपल्या अंगावर येऊन काहीतरी करतील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तटबंदी उभारून आत राहत आहेत. अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खान यानेही 1771 साली मराठी फौजेपासून संरक्षण करण्यासाठी अशीच तटबंदी उभारली होती. म्हणून मला नरेंद्र मोदींमध्ये नजीब खान दिसत आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
हेही वाचा -जळगाव : मनपातील विविध समित्या गठीत करण्यासाठी गटनेत्यांची बैठक
जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल रात्री भुसावळ येथे तेली समाज मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मोदींवर डागले टीकास्त्र
नवीन कृषी कायदे, कामगार कायद्यातील बदल या विषयांवरून मंत्री जयंत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले. ते पुढे म्हणाले, 2019 मध्ये देखील नरेंद्र मोदींची लोकप्रियता होती, असे मानूया. कारण त्यांच्या खासदारांची संख्या जास्त होती. परंतु, त्यानंतर नरेंद्र मोदींनी 2 निर्णय घेतले. पहिल्या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला. त्यामुळे, तटबंदी उभारून मोदी आत राहत आहेत. स्टीलची रेलिंग असो, मोठमोठे खड्डे खोदून, तसेच अर्धा ते एक फुटापर्यंतचे खिळे उभारून मोदींनी तटबंदी तयार केली आहे. शेतकरी आपल्या अंगावर येतील आणि काहीतरी करतील, या भीतीने नरेंद्र मोदी तटबंदीत राहत आहेत.
1771 साली महादजी शिंदे यांनी दिल्लीवर आक्रमण केले होते. मराठी सैन्य आपल्यावर आक्रमण करेल, या भीतीने अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खान याने देखील अशीच तटबंदी उभारली होती. मला नरेंद्र मोदींमध्ये हाच नजीब खान दिसतो, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. नरेंद्र मोदींनी सुरुवातीलाच शेतकऱ्यांशी चर्चा केली असती तर हा विषय इतक्या टोकाला गेला नसता, असेही ते म्हणाले.