जळगाव- भाजप-शिवसेनेतील युती तुटण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शिवसेना भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन करेल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. पाठिंबा कुणाचाही असला तरी शिवसेना सत्तेत राहिलच हे स्पष्ट होत असल्याने शिवसेनेत सध्या जळगावच्या पालकमंत्रीपदाची चर्चा पुढे आली आहे. जिल्ह्यात भाजपला रोखण्यासाठी गुलाबराव पाटील यांना पालकमंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गेल्यावेळी सहकार राज्यमंत्री पद मिळवणारे गुलाबराव पाटील यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाचे दावेदार आहेत. त्या सोबतच सेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील हे देखील मंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत.
हेही वाचा -जळगावात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे अद्याप अपूर्ण; मुख्य सचिवांच्या आदेशाला हरताळ
युतीत असून सुद्धा भाजपने शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल आणि चोपडा या चारही मतदारसंघात बंडखोर उभे केले होते. तरी देखील शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 4 जागा निवडून आल्या. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष असले तरी मुळचे शिवसैनिक असल्याने ते देखील शिवसेना आमदार म्हणूनच गणले जातात. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक 5 आमदार असलेली शिवसेना ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. लोकसभेत प्रामाणिकपणे मदत करून देखील भाजपने विधानसभेला दगा दिल्याचा राग स्थानिक शिवसेना आमदारांत आहे.
लोकसभेला देखील स्थानिक पातळीवर विरोध असताना केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे शिवसैनिकांनी भाजपला मदत केली होती. विधानसभेत मात्र, भाजपने पुन्हा त्रास दिल्याने यावेळी प्रक्षप्रमुखांसह सर्व शिवसेना भाजपच्या विरोधात आहे. आमदार गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मतदारसंघात भाजपच्या बंडखोरांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे हे तिनही नेते भाजपवर नाराज आहेत. सत्तेत आल्यानंतर बंडखोरांच्या पाठिराख्यांचा राजकीय बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिवसेना आमदारांवर राहणार आहे.