जळगाव -जिल्ह्यात आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची कोणत्याही परिस्थितीत हेळसांड होऊ दिली जाणार नाही. या आजाराच्या उपचारासाठी लागणारी साधनसामुग्री व औषधे जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्यात येतील. औषधांसाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करुन देण्यात येईल, असे अश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.
पालकमंत्री पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील म्युकरमायकोसिसच्या वॉर्डास आज (शुक्रवारी) भेट देऊन पाहणी केली, तसेच रुग्णांशीही संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा रुग्णालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी विशेष वॉर्ड
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून, याठिकाणी 50 खाटा ठेवण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत याठिकाणी 15 रुग्ण उपचार घेत असून, 2 रुग्णांवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रुग्णांवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या अतिशय किचकट आणि जोखमीच्या असतात. यासाठी लागणारी साधनसामुग्री जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
'म्युकरमायकोसिस'वरील औषधे जिल्ह्यातच उपलब्ध करून देणार म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या टिमचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोविड, नॉन कोविड रुग्णांच्या उपचाराचाही आढावा घेतला. दरम्यान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लहान मुलांसाठी 10 व्हेंटिलेटर्सचे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. रुग्णालयातील प्रयोगशाळेलाही त्यांनी भेट देऊन यंत्रसामग्रीची माहिती घेतली.
हेही वाचा -संभाजीराजेंच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसाचे अधिवेशन जाहीर करा - चंद्रकांत पाटील