जळगाव - कोरोनाच्या लढ्यात पोलीस तसेच आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पत्रकारांना देखील 25 लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांसंदर्भात माहिती देण्यासाठी गुलाबराव पाटील यांनी रविवारी दुपारी शहरातील अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या प्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्याप्रमाणेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील कोरोनाबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहचावी म्हणून अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्याही कामाची दखल घेण्याची गरज आहे. राज्य सरकारने ज्या प्रमाणे आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे, त्याच धर्तीवर पत्रकारांनाही 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले पाहिजे, या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी करणार असून पाठपुरावा करेन असे आश्वासनही गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच गावपातळीवर स्वच्छता रहावी, यासाठी राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात येत असून त्यांची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २० डिसेंबर, २०१८ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील स्वच्छाग्रहींच्या नियुक्तीला मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. या मागणीस राज्य शासनाची मान्यता मिळाली असून आता ३० मार्च २०२१ पर्यंत स्वच्छताग्रहींच्या नियुक्त्या करता येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या अथवा होण्याचा धोका असणार्या ग्रामपंचायती तसेच या गावांच्या नजीकच्या ग्रामपंचायती किंवा जिल्हाधिकार्यांनी ठरवून दिलेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छताग्रहींची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायत निवडीचा अधिकार हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना राहणार आहे.