जळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा बिबट्याच्या शोधमोहिमेमुळे चर्चेत आले आहेत. गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा जळगावात बिबट्याची शोधमोहीम हाती घेतली. मात्र, यावेळी हातात बंदूक घेऊन नव्हे तर आपले हात बांधून महाजन यांनी बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले.
बिबट्याच्या शोधमोहीमेमुळे गिरीश महाजन पुन्हा चर्चेत; जळगाव विमानतळावर बघितले सीसीटीव्ही फुटेज
बिबटे विमानतळ परिसरात शिरू नयेत म्हणून विमानतळाच्या संरक्षक भिंतीला असलेले मार्ग, छिद्रे बंद करण्यात आले होते. मात्र, तरीही बिबटे याठिकाणी दिसत आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी गिरीश महाजन यांनी विमानतळावर येऊन विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
गेल्या काही दिवसांपासून कुसुंबा शिवारातील जळगावच्या विमानतळावर दोन बिबट्यांचा संचार करीत असल्याचे आढळून येत आहे. रात्रीच्या वेळी हे दोन्ही बिबटे विमानतळ परिसरात वावरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहेत. वनविभागाच्यावतीने या दोन्ही बिबट्यांना पकडण्यासाठी मध्यंतरी ट्रॅपदेखील लावण्यात आले होते. बिबटे विमानतळ परिसरात शिरू नयेत म्हणून विमानतळाच्या संरक्षक भिंतीला असलेले मार्ग, छिद्रे बंद करण्यात आले होते. मात्र, तरीही बिबटे याठिकाणी दिसत आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी गिरीश महाजन यांनी विमानतळावर येऊन विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दोन्ही बिबट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज गिरीश महाजन यांनी पाहिले. यानंतर त्यांनी, आपण यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने उपाययोजना करू, असे आश्वासन दिले आहे.
गिरीश महाजन यांच्यासोबत या पाहणीवेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ यांच्यासह वन विभागाचे तसेच विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपूर्वीही गिरीश महाजन हातात बंदूक घेऊन नरभक्षक बिबट्याला शोधायला निघाले होते. त्यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.