जळगाव -बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारातील संशयित सुनील झंवर याच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात वॉटरग्रेस कंपनीशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. मात्र, भाजप नेते गिरीश महाजन यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा दावा भाजपच्यावतीने रविवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला. जेथे वॉटरग्रेस कंपनीचा ठेका तेथे गिरीश महाजन, असा संबंध जुळवणे चुकीचे आहे, असाही दावा भाजपने यावेळी केला.
बीएचआर गैरव्यवहार, वॉटरग्रेस कंपनीचा ठेका यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी भाजपकडून वसंतस्मृती पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डाॅ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते.
झंवरच्या कार्यालयात कागदपत्रे सापडल्याने महाजनांच्या नावाची चर्चा -
बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सुनील झंवर याच्या कार्यालयात छापा टाकला असता तेथे वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय अधिकाऱ्यांचे शिक्के, महापालिकेच्या वतीने शहराच्या सफाईचा ठेका दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीची काही कागदपत्रे तसेच गिरीश महाजन यांचे लेटरपॅड सापडले. त्यामुळे वॉटरग्रेसच्या ठेक्याशी झंवर याचा संबंध जोडला जात आहे. झंवर हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांचेही नाव बीएचआर प्रकरणाशी जोडले जात आहे. भाजपने मात्र, महाजन यांचा कुठेही संबंध नसल्याचा दावा केला. वॉटरग्रेस कंपनीला अगोदर भाजपचा विरोध होत असताना नंतर सफाईचा ठेका याच कंपनीला कसा दिला गेला, या विषयी स्पष्टीकरण देताना आमदार सुरेश भोळे म्हणाले की, कंपनीच्या कामकाजामध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे त्याला आम्ही विरोध केला. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने ठेका देण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी भाजप अथवा गिरीश महाजन यांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
हेही वाचा -'शेतकरी एका दणक्यात बैलाला सरळ करतो, हे तर सरकार आहे'