जळगाव- तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना उच्च न्यायालयाने वैद्यकीय उपचारासाठी ५ लाखांच्या जातमुचलक्यावर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. जैन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली असल्याने त्यांना उपचारासाठी जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -घरकुल घोटाळा: उच्च न्यायालयाकडून सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन मंजूर
तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात धुळे येथील विशेष न्यायालयाने माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण ४८ आरोपींना शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन यांना १०० कोटी रुपयांचा दंड आणि ७ वर्षे कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या खटल्याचा निकाल लागल्यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता.