जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हातले येथे एका प्रौढ दाम्पत्याचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी ही घटना उजेडात आली आहे. कोणाशी काही वाद किंवा भांडण नसताना धरणाजवळ एका लहान झोपडीत राहणाऱ्या या भिल्ल समाजाच्या दाम्पत्याचा खून कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सुधाकर सुका मोरे (वय 55) आणि साखराबाई सुधाकर मोरे (वय 50) दोघे रा. हातले, ता. चाळीसगाव, अशी खून झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
मोरे दाम्पत्य हातले गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणालगत एका झोपडीत राहत होते. झोपडीजवळच त्यांनी शेती करायला घेतली होती. त्यांची दोन मुले गावात राहतात. शनिवारी पती-पत्नीने शेतात पेरणीचे काम केले होते. शेती केली असल्याने दोघेही रोज दिवसभर शेतीच्या कामातच व्यस्त असत. यामुळे कोणाशी त्यांचे काही घेणेदेणे नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. या घटनेत अज्ञात मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून दोघांचा खून केला आहे. त्यांचा खून नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे आदींनी भेट देऊन पाहणी केली.