जळगाव -ग्रामपंचायत निवडणुका निर्भयपणे व शांततेत पार पाडण्यासाठी उपद्रवी असलेल्यांना तातडीने दोन दिवसासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी आज पोलीस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीत दिले.
हेही वाचा -सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावाप्रकरणी उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द
उपद्रवी व्यक्तींना तात्पुरते हद्दपार करा
जिल्ह्यात शुक्रवारी ७२३ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक झाली. या वेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सचिन गोरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी उपस्थित होते. या वेळी मुंडे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावपातळीवर उपद्रवी व्यक्ती असतात. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या निवडणुकात कोणी काय गुन्हा केला आहे. कोणाविरुध्द गुन्हा, अदखलपात्र गुन्हा दाखल असेल किंवा तक्रारी आलेल्या असतील तर अशा व्यक्तींचे रेकॉर्ड तयार करावे.
अशा व्यक्तींवर विशेष नजर ठेवावी व गरज पडल्यास आपत्कालीन परिस्थितीचे अधिकार वापरून संशयितांना मतदानाच्या आदल्या दिवसापासून तर मतदान होईपर्यंत तात्पुरते हद्दपार करावे. त्यांचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशा सूचनादेखील पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा -मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्या दोन वर्षांपासून फरार दोघा गुन्हेगारांना अटक