जळगाव - भरधाव जाणाऱ्या मालवाहू चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य ठार झाले. हा अपघात आज (सोमवारी) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सहस्त्रलिंग गावाजवळ घडला. या अपघातात ठार झालेले दाम्पत्य हे यावल तालुक्यातील आडगाव-कासारखेडा येथील रहिवासी होते. अपघातात ठार झालेल्या पाटील दाम्पत्याला एक चार वर्षांची मुलगी आहे.
हेमंत पाटील (वय ३३) व ममता पाटील (वय २८) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. ममता पाटील या रावेर वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत होत्या. पाटील दाम्पत्य हे मूळचे यावल तालुक्यातील आडगाव-कासारखेडा येथील रहिवासी होते. मात्र, ममता यांच्या नोकरीमुळे ते पाल येथे स्थायिक झाले होते. सोमवारी दुपारी दोघेही त्यांच्या दुचाकीवरून पाल येथे जाण्यासाठी निघाले होते. रावेर ते पाल रस्त्यावर सहस्त्रलिंग गावाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या मालवाहू चारचाकीने जोरात धडक दिली.