जळगाव -पालिकेच्या महासभेत शहरातील कचरा संकलनाच्या विषयावरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत चांगलीच खंडाजंगी झाली. कचरा संकलनाच्या ठेक्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेतील सदस्यांनी सभेतून काढता पाय घेतला. या विषयावर शिवसेनेने भाजपची कोंडी केल्यानंतर, भाजपच्या सदस्यांनी ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
जळगाव पालिकेच्या वतीने शहरातील दैनंदिन कचरा संकलनासाठी ३ महिन्यापूर्वी नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला 5 वर्षांसाठी 75 कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केल्यानंतर शहरात स्वच्छता होण्याऐवजी अस्वच्छतेत अधिकच भर पडली. यासंदर्भात काही नगरसेवक तसेच नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याने ठेकेदाराने ऑक्टोबरमध्ये केलेल्या कामाचे बिल अदा करू नये, अशा सूचना उपमहापौरांनी लेखी पत्राद्वारे आयुक्तांना केल्या होत्या. मात्र, तरीही प्रशासनाने ठेकेदाराला दीड कोटी रुपयांचे बिल अदा केले. हाच धागा पकडून सेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी स्वच्छतेच्या ठेक्यात सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला होता.
हेही वाचा - मी क्रिकेट खेळाडू नसून प्रशासक, पवारांचा गडकरींना टोला
हेही वाचा - शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी - उद्धव ठाकरे
महासभेत शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित होताच भाजपच्या सदस्यांनी सेनेला लक्ष करत गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध करण्याची मागणी लावून धरली. परंतू, भाजपवर आरोप करणारे सेनेचे नगरसेवक नितीन बरडे हे त्यापूर्वीच सभागृहातून बाहेर पडले होते. त्यामुळे भाजपचे सदस्य अधिक आक्रमक झाले. सेनेचे आरोप निराधार असल्यानेच बरडेंनी पळ काढल्याचा पलटवार भाजपने केला. यावेळी भाजप आणि सेनेच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळल्यानंतर भाजपच्या स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी वॉटरग्रेस कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. वॉटरग्रेस कंपनीच्या कामाविषयी सुरुवातीपासून असंख्य तक्रारी आहेत. सूचना करूनही कामात सुधारणा करत नसल्याने कंपनीला काळ्या यादीत टाकून ठेका काढून घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, प्रशासनाने संबंधित कंपनीला एक महिन्याची मुदत देण्याची विनंती केल्याने सर्वानुमते तसा ठराव करण्यात आला. वॉटरग्रेस कंपनीच्या कामाविषयी आम्ही सुरुवातीपासून असमाधानी आहोत.