जळगाव -गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे अनेक मुहूर्त हुकल्यानंतर आता गुरुवारी (22 ऑक्टोबर) ते आपली कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसात एकनाथ खडसे मुलीसह राष्ट्रवादीत जाणार?
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची नाराजी सर्वश्रुत आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्यार असल्याची चर्चा आहे. महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांनी तर त्यांचे प्रवेशापूर्वीच स्वागतही केले आहे. तर भाजपा नेते खडसे पक्ष सोडणार नसल्याचे सांगत आहेत. मात्र, येत्या दोन दिवसात खडसे काहीतरी हालचाली करणार अशी माहिती समोर येते आहे.
राष्ट्रवादी प्रवेशासाठी एकनाथ खडसे हे उद्या(बुधवारी) काही मोजक्या कार्यकर्त्यांसह मुंबईला जाणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा प्रवेश सोहळा हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परंतु, या माहितीला अद्याप खडसेंनी कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिलेला नाही.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय ठरलेला आहे, असे सांगितले जात आहे. खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार आहेत. त्या मात्र, भाजपामध्येच राहणार असल्याचे समजते. खडसे सध्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसमध्ये आहेत. उद्या मोजक्या कार्यकर्त्यांबरोबर ते मुंबईकडे निघणार आहेत. खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर या सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आहेत, तर खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमन आहेत. 'महानंद'च्या अध्यक्षा म्हणूनही त्या काम पाहत आहेत. जळगाव जिल्हा दूध संघ आणि जिल्हा बँकेवर भाजपाची सत्ता आहे. खडसेंनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर भाजपाच्या हातून ही संस्थाने जातील, असा अंदाज आहे.