जळगाव -'बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर व तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यांनी ३० दिवसांच्या आत पोलिसांना शरण यावे. अन्यथा, त्यांना या गुन्ह्यात फरार घोषित करण्यात येईल,' असे घोषणापत्र प्रसिद्ध करण्याचे आदेश पुणे विशेष न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, पुणे पोलिसांच्या पथकाने झंवर व कंडारे यांच्या घरांसह इतर ठिकाणी नोटिसा लावल्या आहेत.
बीएचआर घोटाळा प्रकरणी सुनिल झंवर, जितेंद्र कंडारेंना नोटिसा पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बीएचआर सोसायटीतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी वर्ग करण्यात आली. या शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात येऊन सीए महावीर जैन, प्रकाश वाणी, विवेक ठाकरे, धरम साखला, कमलाकर कोळी यांना अटक केली. यांनतर २२ जानेवारी २०२१ रोजी सुनील झंवर याचा मुलगा सूरज याला अटक केली.
झंवर व कंडारे यांनी ३० दिवसांच्या आत पोलिसांना शरण यावे
गुन्हे दाखल झाल्यापासून प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर व तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे हे दोघे बेपत्ता झालेले आहेत. पोलिसांनी राज्यभरात त्यांचा शोध घेतल्यानंतरही ते सापडले नाहीत. दरम्यान, या दोघांना फरार घोषित करावे, अशी मागणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात केली आहे. त्या अनुषंगाने कागदपत्रे तयार करून न्यायालयास सादर केली आहेत. त्यावर पुण्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी न्यायालयाने आदेश केले. झंवर व कंडारे यांनी ३० दिवसांच्या आत पोलिसांना शरण यावे. अन्यथा, त्यांना फरार घोषित करण्यात येईल, असे घोषणापत्र प्रसिद्ध करण्याचे आदेशात म्हटले आहे. या आशयाच्या नोटिसा पुणे पोलिसांच्या पथकाने आज सुनिल झंवर व जितेंद्र कंडारे यांच्या घरांसह काव्यरत्नावली चौक, टावर चौक, शहर पोलीस ठाणे, आदी ठिकाणी लावल्या आहेत.