जळगाव - जनता अशिक्षित राहावी हाच प्रयत्न काँग्रेसने नेहमी केला. जनता अशिक्षित राहिली, तर ती आपल्या मागे राहणार, असे त्यांना वाटत होते. मात्र, आमच्या सरकारला लोकांना श्रीमंत करण्यात रस आहे. आम्ही जनतेची कामे मते मिळवण्यासाठी करत नाही, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जळगावात केले आहे.
आमच्या सरकारकडून २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला पक्के घर दिले जाणार आहे. जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे २३०० कोटी रुपये खर्चाच्या भागपूर उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, २०२२ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होतील. तेव्हा एकाही घरात शौचालय नाही, असे असता कामा नये. एकही घर गॅस जोडणी शिवाय असणार नाही, देशात सर्वत्र पक्के रस्ते असावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. आमचे सरकार गरीब आणि कष्टकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.