जळगाव -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शनिवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ लक्षात घेऊन विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, परिसंस्थामधील आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे मार्च, एप्रिल, मे २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे सरसकट परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - 'या' पाच न्यायमूर्तींचे पीठ देणार अयोध्येचा ऐतिहासिक निकाल
निर्णयामुळे अंदाजे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवा सेना, दर्जी फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच या संघटनांकडून अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली होती. या बैठकीत या संघटनांच्या निवेदनावर सविस्तर चर्चा झाली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे बहुसंख्य पालक शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका दिलीप पाटील यांनी मांडली.