जळगाव- पोलिसांनी चाळीसगाव तालुक्यात गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला. मात्र तो ट्रक त्याचठिकाणी जप्त न करता जळगावात आणण्यात आला होता. या प्रकरणात मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी ही कारवाई केली. अधीक्षकांनी बुधवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले.
मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, प्रवीण हिवराळे, महेश पाटील, मनोज दुसाने, पोलीस मुख्यालयातील नटवर जाधव व मेहुणबारे पोलीस ठाण्याचे रमेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी रात्री निलंबनाचे आदेश काढले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी केला ट्रकचा पाठलाग
१६ ऑक्टोबरच्या रात्री (एमएच १८ एम ०५५३) क्रमांकाच्या ट्रकमधून ६६ लाख ८६ हजार ९९९ रुपयांचा गुटखा धुळ्याहून मेहुणबारेकडे आणला जात होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा व मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यात हा ट्रक अडवला. चौकशी केल्यानंतर हा ट्रक मेहुणबारे पोलीस ठाण्यात जप्त न करता जळगावात आणला जात होता. ही माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित ट्रकचा पाठलाग केला. पहाटेच्या वेळी हा ट्रक जळगाव शहरातील शिरसोली रोड परिसरात चव्हाण यांनी अडवला होता. यावेळी ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची असल्याची माहिती पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आमदार चव्हाण दिली होती.