महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क; मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

कोथळी गावातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत एकनाथ खडसे यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी तथा महानंद दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, सून रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे, शारदा खडसे-चौधरी आदी उपस्थित होते. सर्वांनी एकाच वेळी मतदान केले.

खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

By

Published : Apr 23, 2019, 10:50 AM IST

जळगाव -भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज ९.३० वाजता आपल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावी कुटुंबियांसोबत मतदान केले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी 'ई- टीव्ही भारत'शी संवाद साधला. गेल्या पाच वर्षाच्या काळात मोदी सरकारने देशाचा जो विकास केला आहे, त्याच्या जोरावर पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

कोथळी गावातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत एकनाथ खडसे यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी तथा महानंद दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, सून रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे, शारदा खडसे-चौधरी आदी उपस्थित होते. सर्वांनी एकाच वेळी मतदान केले.

खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे येथील मतदार पुन्हा खासदार म्हणून रक्षा खडसेंना संधी देतील, असा विश्वास देखील एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. रक्षा खडसेंना पुन्हा संधी मिळाली तर पुढच्या काळात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकू, असेही ते म्हणाले.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला रावेरमध्ये शिवसेनेची नाराजी होती. मात्र, युती झाल्यानंतर शिवसेना भाजपसोबत आली. प्रचारातही भाजप आणि शिवसेना सोबतच होते. त्याचा फायदा आता रक्षा खडसेंना होणार आहे, असा पुनरुच्चार खडसेंनी केला.

दरम्यान, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला आहे. देशाला जगात वेगळी ओळख त्यांनी मिळवून दिली. त्यांचे नेतृत्वच देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकते. त्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकारच विराजमान झाले पाहिजे, अशी अपेक्षा खडसेंनी व्यक्त केली. ही देशपातळीवरचे नेतृत्व ठरवणारी निवडणूक असल्याने मतदारांनी देखील विचारपूर्वक मतदान केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details