जळगाव -कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लघंन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील 5 दुकान मालकांना नियमांचे उल्लंघन करणे चांगलेच भोवले आहे. नगरपालिका प्रशासनाने चौकशी करत या दुकान मालकांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे लॉकडाऊनच्या काळात चोरी-छुपे दुकाने उघडणाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा भुसावळसह चोपडा तालुक्यातील अडावद येथे 43 कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा रेडझोनमध्ये आहे. असे असतानाही देखील चोपडा शहरातील काही दुकानदार बेफिकिरीने वागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील अनेक कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सर्रासपणे उघडून वस्तूंची खरेदी विक्री सुरू होती. काही दुकानदारांनी आपल्या दुकानांचे शटर अर्धे उघडून व्यवहार सुरू केले होते. अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची भीती असल्याने काही सुज्ञ नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.