जळगाव - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये धामण सापाला युवकाने रस्त्यावर आपटून-आपटून जागीच ठार केल्याचे समोर आले आहे. एका प्राण्याला अशा निर्दयीपणे ठार केल्याने, जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या युवकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी, वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात धामण सापाला रस्त्यावर आपटून केले ठार, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे 'व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील असल्याचा अंदाज'
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील युवक हे कुठल्या भागातील आहेत, याबाबतची माहिती आणखी समोर आली नाही. मात्र, घटनास्थळी असलेल्या दुचाकीचा क्रमांक व संबंधीत युवकांच्या बोली भाषेवरून हा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण शेतातून या धामण सापाचा पाठलाग करत रस्त्यावर येतोय. पुढे मुख्य रस्त्यावरून दुचाकीवर तरुण जात आहेत. दरम्यान, हा धामण सर्प त्यांच्या दुचाकीजवळ येतो तेव्हा ते दुचाकीवरून खाली पडतात. या पाठोपाठ हा तरुण त्या धामण सापाला पकडून त्याला रस्त्यावर आपटत आहे.
'वन विभागाने दिले चौकशीचे आदेश'
या व्हिडिओतील तरुणांच्या गाडीचा क्रमांक (एमएच १९ बीबी १४९०) असा आहे. हा क्रमांक पाहून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक आणि बाळकृष्ण देवरे यांनी जळगाव वनविभागाचे उपवन संरक्षक विवेक होशिंग यांना हा व्हिडिओ पाठवला आहे. तसेच, संबंधीत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, विवेक होशिंग यांनी संबंधित कार्यालयाला तत्काळ या दुचाकीचा आणि धामण सापाला मारणाऱ्या तरुणांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
'संबंधित तरुणावर कारवाई व्हावी'
कोणताही वन्यजीव हाताळणे, त्याचा पाठलाग करणे, जखमी करणे, ठार मारणे किंवा वन्यजीवास त्रास होईल असे कुठलेही कृत्य वन्यजीव संरक्षण अधिनियम (१९७२) नुसार गुन्हा ठरतो. यानुसार, सापाला ठार करणाऱ्या गुन्हेगारास जबर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.