जळगाव -महामार्गावर गतिरोधकामुळे दुचाकीची गती कमी करताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिची 4 वर्षांची नात गंभीर जखमी झाली आहे. महिलेचा पती देखील किरकोळ जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता जळगाव-भुसावळ महामार्गावर कालिंका माता मंदिरासमोर हा अपघात झाला. जळगावात दीड महिन्यानंतर महामार्गावर हा दुर्दैवी अपघात घडला.
जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी वसीम खान (वय ४३) पत्नी रेहानाबी (वय ३८) तसेच 4 वर्षीय नात सामिया हिला साेबत घेऊन दुचाकीवरून (एमएच १९ बीटी ९९७१) धान्य घेण्यासाठी घरातून निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर अजिंठा चौफुलीकडून कालिंका माता मंदिर चौकात दुचाकी आली असताना गतिरोधकावर त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच १५ ईजी ७८५७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात खान दाम्पत्य दुचाकीवरुन फेकले गेले. चालक वसीम खान दुचाकीसह एका बाजूला तर, पत्नी रेहानाबी नातीसह रस्त्यावर पडल्या. यावेळी ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने जागेवर त्यांचा मृत्यू झाला. तर सामियाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.