महाराष्ट्र

maharashtra

लाॅकडाऊन : जळगावात 4 दुकाने 'सील'... कारवाईनंतर इतर दुकाने बंद

By

Published : May 7, 2020, 5:29 PM IST

गुरुवारी शहरातील शनिपेठ भागात 3 कपड्यांचा दुकानांवर तर बोहरा गल्लीतील एका इलेक्ट्रिक वस्तुंच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. ही चारही दुकाने सील केली आहेत.

4-shops-sealed-in-jalgaon
4-shops-sealed-in-jalgaon

जळगाव- शहरातील शनिपेठ व बोहरा गल्लीत सुरक्षित अंतर न पाळता तसेच प्रमाणाबाहेर ग्राहकांची गर्दी झाली होती. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून 4 दुकाने सील करण्यात आली आहेत. आठवडाभरात मनपाकडून अशा प्रकारची ही दुसरी मोठी कारवाई आहे.

जळगावात 4 दुकाने 'सील'

हेही वाचा-लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...

जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यामुळे शहरात अत्यावश्यक सुविधा सोडून इतर दुकाने देखील उघडण्यात आली आहेत. मात्र, दुकाने उघडल्यानंतर दुकानदार असो वा ग्राहक, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे गुरुवारी शहरातील शनिपेठ भागात 3 कपड्यांचा दुकानांवर तर बोहरा गल्लीतील एका इलेक्ट्रिक वस्तुंच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. ही चारही दुकाने सील केली आहेत. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्त्वाखाली मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील, अतिक्रमण निर्मुलन अधीक्षक एच.एम. खान यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

'या' दुकानांवर झाली कारवाई..
शनिपेठ भागातील नरेंद्र द मॉल, कुमार कलेक्शन व पुष्पा कलेक्शन ही दुकाने सील करण्यात आली आहेत. तर बोहरा गल्लीत देवल गांधी यांचे दुकान सील करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात दाणा बाजारात 6 दुकाने सील करण्यात आली होती. 3 दिवस ही दुकाने बंद होती. त्यानंतर उपायुक्तांनी प्रत्येकी 5 हजार रुपये दंड आकारुन दुकानांचे सील उघडले होते.

मनपाच्या कारवाईनंतर इतर दुकाने झाली बंद..
मनपाच्या पथकाने शनिपेठ भागात कारवाई केल्यानंतर सुभाष चौक, महात्मा गांधी मार्केट, चौबे शाळा परिसरातील सर्व दुकाने दुकानदारांनी बंद केली. तसेच भाजीपाला व फळ विक्रेत्यांनीही पळापळ सुरू केली. यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळ देखील निर्माण झाला होता.

मास्क न लावणाऱ्यांना 500 रुपये दंड..
मनपा उपायुक्तांनी शनिपेठ, बळीराम पेठ व चौबे शाळा परिसरातील 9 दुकानदारांना मास्क न लावल्यामुळे प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांनावर 200 रुपयांचा दंड ठोठावून जागच्या जागी वसूल केला. दरम्यान, प्रत्येक दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंग पाळूनच व्यवसाय करण्याचे आवाहन उपायुक्त संतोष वाहुळे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details