हिंगोली- युतीच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अजूनही प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांना हे माहीत असावं की, आम्ही जेव्हा कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरतो ते कुस्ती हरण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठीच उतरतो, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक यशपाल भिंगे यांनी केले. सत्ता संपादन महारॅलीसाठी ते हिंगोलीमध्ये आले होते.
आम्ही ताकतीने लढणार आहोत, या मध्ये अजिबात गैर नाही. एवढेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीला जनतेचा प्रतिसाद बघता आमचे सरकार निश्चित येणार आहे. तसेच आम्ही एकमेकांचे शत्रू तर अजिबात नाहीत. आमच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. तसेच आमच्याकडे पैसा नाही कुठलेही भांडवल नाही आणि यंत्रणा देखील नाही. हे सर्व जरी नसले तरीही राजकिय भूमिकेवर ठाम राहून प्रतिस्पर्धीला घायाळ करणार, चित्त करणार हे आमचं अंतिम ध्येय आहे, असे यशपाल भिंगे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीला जनतेचा आम्हाला असलेला प्रतिसादावरुन आम्ही सत्तेत येणार असल्याचे भिंगे यांनी सांगितले.