हिंगोली - संत नामदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नरसी गावात नामदेवाच्या दर्शनासाठी परतवारी निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासून आतापर्यंत ५ लाखाच्यावर भाविकांनी दर्शन घेतले. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे, यासाठी संस्थेच्यावतीने दर्शन रांगा बनविण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.
संत नामदेवाची जन्मभूमी असलेले नरसी नामदेव हे सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक आषाढी एकादशी आणि परत वारीनिमित्त आवर्जून दर्शनासाठी हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर पंजाबमधून शीख बांधव देखील या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आज याठिकाणी पायदळी दिंड्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या, सोबतच हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते. जिल्ह्यात २ ते ३ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, पावसात देखील भाविक नामदेवाच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावत असल्याचे पहावयास मिळाले.