हिंगोली - अगोदरच कोरोनामुळे जिल्ह्यातील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती हा सैरावैरा झाला आहे. ते दररोज मजुरी करून खाण्यापिण्याची व्यवस्था करीत असतात. मात्र, 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 6 ते 19 या कालावधी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकांनी नेमकं कसं खावं अन् जीवन जगावं हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे निदान लोकांच्या खात्यावर 10- 10 हजार रुपये टाकावेत अन् लॉकडाऊन लावावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. आज हिंगोली येथील गांधी चौक भागातील संविधान कॉर्नर येथे घोषणाबाजी केली. मागण्या पूर्ण न केल्यास लॉकडाऊन तोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष वशिम देशमुख यांनी दिला आहे.
संपूर्ण जगभरात खळबळ उडविलेल्या कोरोनामुळे हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार महिन्यापासून भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच कालावधीत केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांजवळील असलेली जमापुंजी पूर्णपणे संपलेली आहे. यामध्ये कामगार, बांधकाम कामगार, रोजगार, व्यापारी, फळ विक्रेते, फुल विक्रेते, हातगाडी, आदी हातावर पोट असणारे हतबल झालेले आहेत. तरीदेखील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने परत 6 ते 19 ऑगस्ट, असा लॉकडाऊन करण्याची घोषणा 3 ऑगस्टला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.