हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. सेनगाव तालुक्यात भगवती येथील 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 228 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 186 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्या एकूण 42 कोरोनाबाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. केवळ प्रशासनाच्या सतर्कतेमुळेच कोरोना रुग्ण आढळलेला भाग काही वेळातच सील केला जात आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिक खबरदारी घेत आहेत. नव्याने आढळलेले तिन्ही रुग्ण हे मुंबई येथून आपल्या गावी परतले होते. तसेच वसमत येथील कुरेशी मोहल्ला आणि अशोक नगरमध्ये आढळलेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.