हिंगोली-सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवाची जराही पर्वा न करता हिंगोली शहरातील गल्ली बोळ स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असताना हिंगोली नगर पालिकेतील एका सफाई कामगाराचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. कारण अजून तरी स्पष्ट झालेले नसले तरीही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने मृतदेह हा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला असून, मृताचे नावही गोपनीय ठेवले आहे. मात्र अचानक झालेल्या मृत्यूमुळे सफाई कामगारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोलीत कर्तव्यावर असताना सफाई कामगाराचा मृत्यू, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
हिंगोली नगर पालिकेतील एका सफाई कामगाराचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अजून तरी स्पष्ट झालेले नसले तरीही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने मृतदेह हा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला असून, मृताचे नावही गोपनीय ठेवले आहे.
मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार आहे. तत्पूर्वी या कर्मचाऱ्यांचा स्वॅब घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. सद्यस्थितीत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अशा स्थितीमध्ये पालिकेचे सफाई कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.
मात्र, एका कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्याचा मृतदेह प्रशासनाच्यावतीने पीपीई किट परिधान करून ताब्यात घेण्यात आला आहे, शिवाय या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी देखील अति बारकाईने केली जाणार असून त्याच्या घशातील लाळेचा नमुना देखील औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. शवविच्छेदन व कोरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या व्यक्तीला नेमका आजार काय होता, हे समजण्यास मदत होणार आहे. मात्र सहकारी अचानक निघून गेल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.