हिंगोली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे संचारबंदीत नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा घेत पोलीस कर्मचारी चक्क दिसेल त्याला मारत सुटत आहेत. शहरात तर एका बिट जमादार असलेल्या वडिलासमोरच परिचारिका असलेल्या मुलीला पोलिसांनी चोप दिला. एवढेच नव्हे, तर या पोलिसांनी त्या बिट जमादाराला देखील सोडले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची काय बिशाद आहे, असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रियांका साहेबराव राठोड असे जखमी झालेल्या परिचरिकेच नाव आहे. संचारबंदीत एकीकडे नागरिकांना नगरपालिका भाजीपाला व किराणा मिळावा म्हणून व्यवस्था करत आहे. नागरिकांना घरपोच राशन मिळण्याची व्यवस्था लावत आहे. परंतु तोपर्यंत किराणा सामान घेण्यास गेलेल्या वृद्ध नागरिकांनाही काही पोलीस विनाकारण बदडत आहेत.
कनेरगाव चौकीचे बिट जमादार साहेबराव राठोड हे त्यांची मुलगी प्रियंका राठोड यांना आरोग्य केंद्रात सोडण्यासाठी जात होते. यावेळी शहरात तैनात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची दुचाकी अडवली अन त्यांना बदडायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या मुलीला देखील मारण्यास सुरुवात केली. मी परिचारिका आहे, अन् कर्तव्यावर जात आहे. माझे वडीलही त्यांच्या कर्तव्यावरुन आले आहेत, असे विनवण्या करुन सांगितले. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पोलिसांनी मारहाण केली. यावेळी परिचारिका गाडीवरुन पडली तर वडिलांनी माराच्या भीतीने पलायन केले. यात पोलिसांनी परिचारिकेला डोके फुटेपर्यंत मारले. यावरुनच हिंगोली पोलिसांचे रोगापेक्षा इलाज भारी हेच धोरण असल्याचे दिसून आले आहे.
रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना आणि खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांना हिंगोलीतील काही पोलीस असे गुरासारखे मारत असतील, तर येथे गरीब जनतेचे काय ? नागरिक आता कुणाला विचारतील अशी गत झाली आहे. राजाने मारले पावसाने झोडपले मग दाद कुणाकडे मागायची ? असा बाका प्रसंग खुद्द अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर आला आहे.
विनाकारण फिरू नका आणि मास्क बांधून फिरा असे सांगणाऱ्या हिंगोली पोलिसांनी चक्क संसर्ग होण्यापासून वाचवण्याच्या एका मूलभूत नियमाला तिलांजली देऊन टाकली आहे. वसमतच्या चौकाचौकात नागरिकांना थांबून पोलीस चक्क एकाच रांगेत उभे करून उठाबशा काढायला लावत आहेत. पोलीस कर्मचारी तसेच उठाबशा करणारे नागरिक यांच्यामध्ये साध्या एक फुटाचे सुद्धा अंतर नसल्याचे व्हायरल व्हिडिओवरून दिसत आहे. म्हणजेच निदान एक मीटरचे तरी अंतर ठेवा हा नियम स्वतः पोलिसांनी धाब्यावर बसवला आणि नागरिकांना मात्र मास्क वापरा असे सल्ले देत सर्रास झोडपणे सुरू आहे. त्यामुळे आता या संकटातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कसे वाचवतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.