महाराष्ट्र

maharashtra

पांगरा शिंदे परिसरात गूढ आवाजाचे सत्र कायम; पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

वसमत तालुक्यात अनेक दिवसांपासून भूगर्भातून गूढ आवाज येण्याचे सत्र सुरूच आहे. आज सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी पांगरा शिंदे परिसरात जमीन हादरली. काही घरातील भांडे जोराने जमिनीवर कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

By

Published : Jan 30, 2021, 6:38 PM IST

Published : Jan 30, 2021, 6:38 PM IST

Earthquake Pangra Shinde area
गूढ आवाज पांगरा शिंदे परिसर

हिंगोली- वसमत तालुक्यात अनेक दिवसांपासून भूगर्भातून गूढ आवाज येण्याचे सत्र सुरूच आहे. आज सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी पांगरा शिंदे परिसरात जमीन हादरली. काही घरातील भांडे जोराने जमिनीवर कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घटनेची कुठेही नोंद झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागने दिली. हा गूढ आवाज गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू आहे. या प्रकाराने ग्रामस्थही चांगलेच भयभीत झालेले आहेत. याबाबत पाहणी करण्यासाठी अजून तरी गावामध्ये प्रशासकीय अधिकारी दाखल झालेला नाही.

हेही वाचा -गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सरपंचांचा आनंद ठरला क्षणिक

वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून भूगर्भातून आवाज येत आहे. आवाज येताना अचानक हादरे जाणवू लागतात. कित्येकदा तर या भागातील ग्रामस्थांनी रात्ररात्र देखील जागून काढलेली आहे. आज सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ग्रामस्थ हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून नुकतेच सावरून शेतीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत. घरी असलेली वयोवृद्ध मंडळी व चिमुकल्यांनी हा प्रकार आपल्या आई-वडिलांना फोनद्वारे सांगितला. तात्काळ आईवडिलांनी घरी धाव घेतली. यावर शास्त्रज्ञांनी अनेकदा या भागातील जमिनीची पाहणी केली. मात्र, अजूनही भूगर्भातील आवाजाचे गूढ हे उकलले नाही. त्यामुळे, या भागातील ग्रामस्थांना या आवाजाला सामोर जावे लागत आहे.

आवाज आल्यानंतर ग्रामस्थ हे तत्काळ प्रशासनाला कळवतात. प्रशासकीय अधिकारी या भागात धाव घेऊन ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार नियमित सुरू असून, जमिनीतील गूढ आवाजाचे गूढ उकलून काढावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे.

गूढ आवाजाचे उकलेना गूढ

वसमत तालुक्यासह कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये या गूढ आवाजाने ग्रामस्थ चांगलेच वैतागून गेलेले आहेत. रात्री-अपरात्री होत असलेल्या या आवाजामुळे वयोवृद्ध मंडळी घाबरून जात आहे. कित्येकवेळा ग्रामस्थांनी अंगणामध्ये रात्र काढली. मात्र, काही केल्या या भागातील आवाजाचे गूढ अजूनही उकलण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. तर, अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.

हेही वाचा -जीएसटीतील किचकट तरतुदींविरोधात कर सल्लागार व व्यापाऱ्यांचे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details