हिंगोली - जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध दारूविक्रीवर अनेकदा छापे मारून देखील दारूविक्री जोरात सुरू आहे. औंढा नागनाथ येथे तर एका दारूविक्रेत्याने चक्क रस्त्यावर तंबू ठोकून दारूविक्रीला सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाल्याने सदर दारूचे दुकान हटवून परवाना रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मात्र, रस्त्यावर तंबू ठोकून दारूविक्रीला सुरुवात केली.
दारू विक्रेत्याने गाठला कळस; चक्क रस्त्यावरच तंबू उभारून करतोय दारूविक्री
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे एकाने तर, रस्त्याच्या बाजूलाच तंबू ठोकून त्यात दारूविक्रीला सुरुवात केली आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनेक नागरिकांनी या प्रकाराची तक्रार केली. मात्र, काहीच कारवाई होत नसल्याने आता नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत, हे दुकान बंद करून सदर दारू विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दारू विक्रीचा परवाना दिला आहे. मात्र, परवाना दिल्यानंतर तिकडे साधे डोकावूनही न पाहिल्याने याचा फायदा दारू विक्रेत्यांनी घेतल्याचे चित्र आहे. एकाने तर, रस्त्याच्या बाजूलाच तंबू उभारून त्यात दारूविक्रीला सुरुवात केली आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी याबाबत तक्रार केली. मात्र, प्रशासनाने विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे दारू विक्रेत्याचे चांगभले झाले आहे. तर, याठिकाणी तळीराम दिवस-रात्र हजेरी लावत असल्याने या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या भागातील रहिवासी असलेले मोहम्मद फयाजोद्दीन, रामनिवास राठी, लक्ष्मण पवार, प्रवीण सोनी, सुनील मस्के यासह काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत हे दुकान बंद करून सदर दारू विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे संचारबंदीच्या काळातही हा अजब प्रकार सुरू असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.