महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारकडून संत नामदेव महाराज पालखी दुर्लक्षित; परवानगी नाकारल्याने संस्थानासह वारकऱ्यांमध्ये नाराजी

राज्यामध्ये सध्या कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी पायी दिंडी सोहळ्याला बंदी घालण्यात आली. मात्र, वारी खंडीत होऊ नये म्हणून राज्यभरातील काही प्रमुख पालख्यांना सरकारने परवानगी दिली. त्या पालख्यांची पंढरपूर येथे जाण्यासाठी राज्य सरकारकडून शिवशाही एसी बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला परवानगी नाकारण्यात आली.

By

Published : Jul 2, 2020, 1:13 PM IST

Sant Naamdev
संत नामदेव

हिंगोली -विठ्ठलाचे सर्वांत लाडके भक्त म्हणून परिचित असलेल्या संत नामदेव महाराजांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे झाला. नामदेवांनी संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. मात्र, अशा थोर संतांच्या पालखीला परवानगी नाकारून राज्य सरकारने एक प्रकारे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे नरसी नामदेव संस्थान व नामदेवांच्या लाखो अनुयायांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून संत नामदेव महाराज पालखी दुर्लक्षित

राज्यामध्ये सध्या कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी पायी दिंडी सोहळ्याला बंदी घालण्यात आली. मात्र, वारी खंडीत होऊ नये म्हणून राज्यभरातील काही प्रमुख पालख्यांना शासनाने परवानगी दिली. त्या पालख्यांची पंढरपूर येथे जाण्यासाठी राज्य सरकारकडून शिवशाही एसी बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला परवानगी नाकारण्यात आली. संस्थान व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालखीला परवानगी मिळावी म्हणून राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र, काही उपयोग झाला नाही.

अखेर 30 जूनला स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेत केवळ तीन वारकरी नामदेवांच्या पादुका घेऊन एका खासगी जीपमधून पंढरपूरकडे रवाना झाले. संत नामदेव महाराजांच्या पालखीला राज्य सरकारने परवानगी न देऊन दुर्लक्षित केले आहे. संत नामदेवांचे जन्मस्थळापासून निघालेल्या या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये हजारो वारकऱ्यांचा सहभाग असतो. एवढेच नव्हे तर या पालखी सोहळ्याचा तीन ठिकाणी भव्य असा रिंगण सोहळा देखील होतो. पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराज पालखीकडून पुष्प प्रदक्षिणा करण्यात येते. प्रमुख संस्थानच्या पालखींचे स्वागत करण्याचा मान मागील अनेक वर्षांपासून नरसी येथील संत नामदेवांच्या पालखीलाच आहे. मात्र, सरकारच्या दुर्लक्षामुळे यावर्षी ही परंपरा खंडीत झाली.

नामदेवांच्या पालखीची सर्वांनाच होती प्रतीक्षा -

नामदेव महाराजांची पालखी मोठ्या थाटामाटात निघते. पालखीचा पहिला रिंगण सोहळा हा हिंगोली शहरातील रामलीला मैदानात होतो. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी जिल्हाभरातून अनेक भाविक आवर्जून हजेरी लावतात. या रिंगण सोहळ्याची सर्व तयारी ही नगरपालिकेच्यावतीने केली जाते. या रिंगण सोहळ्यात धावणारे अश्व आणि त्यावर दिंडीतील सहभागी वारकरी धाडसी कसरती करत असल्याने, हा रिंगण सोहळा सर्वांच्या नजरा खिळून ठेवतो. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच कोरोना संकटामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details