हिंगोली- प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी 4 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या आता 270वर पोहोचली आहे. यापैकी 238 रुग्ण हे बरे झाले आहेत. तर, 32 रुग्णांवर उपचार सुरू असून, हिंगोली जिल्ह्यातील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा हैदराबाद येथील रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे.
नव्याने आढळले रुग्ण हे सेनगाव क्वारंटाइन सेंटरमध्ये होते. ते केंद्रा बु येथील रहिवासी असून, ते पुणे येथून आले तेव्हापासून त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तर वसमत येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती पुणे येथून आलेली आहे.
तर हिंगोली शहरातील तलाबकट्टा परिसरात निलंगा येथून दाखल झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका रुग्णाचाही अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नव्याने आढळेल्या कोरोना रुग्णांना कोरोना केअर सेंटर तसेच कोविड वार्डमध्ये हलविले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील एका 70 वर्षीय व्यक्तीला फुफुसाचा त्रास होत होता, त्याला प्रथम हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. तेथे प्रकृतीत काहीही सुधारणा न झाल्याने रुग्णाला नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथेही तो प्रतिसाद देत नसल्याने त्याला हैदराबाद येथे हलविण्यात आले.
उपचारादरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तिघांचा कोरोनाने बळी गेला आहे. हा रुग्ण हा कळमनुरी तालुक्यातील घोळवा येथील रहिवासी होता. हैदराबाद येथून आलेल्या तिघांसह रुग्णवाहिका चालकालाही क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले आहे.