हिंगोली -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी केवळ २ लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. ही कसली कर्जमाफी ही तर या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टाच सुरू असल्याचा आरोप जिल्ह्यातील समगा येथील नारायण भालेराव आणि संजय भोसले या शेतकऱ्यांनी केला आहे. कोऱ्या सातबारावरून २ लाखांवर हे सरकार येऊन ठेपल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी हा निसर्गासमोर हतबल झाला आहे. यात शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर निश्चितच आपल्याला दिलासा मिळेल अशी अनेक शेतकऱ्यांनी आशा बाळगली होती. मात्र, याही सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कर्जमाफी होणार आहे. यासाठी कोणतीही अट लागू करण्यात आली नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचे काहीही होणार नाही.