हिंगोली -गोरेगाव येथील एक शेतकरी गेल्या 38 वर्षांपासून सेंद्रिय ऊसाचे गुऱ्हाळ चालवत आहे. माधव कावरखे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अतिशय चांगल्या प्रतिच्या आणि आरोग्यदायी गुळामुळे कावरखे यांच्या गुळाला चांगलीच मागणी आहे. त्यांनी आपल्या उत्पन्नाचा दर्जा टिकवून ठेवल्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
कावरखे यांच्याकडे वडिलोपार्जित 12 एकर शेती आहे. यापैकी, एका एकरात त्यांनी सेंद्रिय ऊसाची लावगड केली आहे. जवळपास 38 वर्षांपासून ते सेंद्रिय खतापासून ऊसाचे उत्पन्न घेतात. लागवडीनंतर पहिल्या वर्षापासूनच त्यांनी गुऱ्हाळ सुरू केले. यातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. पहिल्या वर्षी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद होता. मात्र हळूहळू ग्राहकांची संख्या प्रचंड वाढत गेली.