औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची सुरक्षा रक्षकासोबत झटापट
बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरातील सुरक्षा रक्षकासोबत भाविकाने वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाले.
हिंगोली - बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरातील सुरक्षा रक्षकासोबत भाविकाने वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाले. आजूबाजूच्या भक्तांनी आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा वाद निवळला. त्यामुळे देवालयाच्या परिसरात होणारा तांडव थांबण्यास मदत झाली. वाद निवळला असला तरी त्या भाविकांनी थेट पोलीस ठाणे गाठून तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औंढा नागनाथ संस्थान चर्चेत आले. अंतर्गत वादातून तर हे संस्थान नेहमीच चर्चेत राहते. मात्र, आज पहिल्यांदा भाविक आणि सुरक्षा रक्षकाच्या वादाने चर्चेला पुन्हा सुरुवात झाली.
प्रवीण गोबाडे, अमोल भांडे, बबन सोनवणे असे आरोपींची नावे आहेत. औंढा नागनाथ येथील मंदिरात दर्शनासाठी नेहमीच रांगा असतात. आज रविवार असल्याने तर दर्शनासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. मंदिरात आज दुपारी ३.४५ च्या सुमारास संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते विश्रामग्रहात बैठक आटोपून नागनाथाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात आले होते. तर भक्तगण मंदिराच्या हरहर महादेव, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत होते. दरम्यान मंदिरातील पुजारी आले आणि त्यांनी भाविकांकडे पाहून काही तरी पुटपूटले, त्यांच्याकडे बघून तुम्हाला दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही, असे म्हणत रांगेत बेंच लावला. तेवढ्यात तिघांनी धावत येऊन मारहाण करीत बाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आणि सुरक्षा रक्षक यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे मंदिर परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. झालेल्या मारहाणीत काही कार्यकर्ते जखमीही झाले आहेत.
मंदिर परिसरात एवढे मोठे वादंग झाल्याने याची जोरदार चर्चा रंगत आहे. एवढेच नव्हे तर देवाच्या दारी चक्क भाविकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने चांगलीच खळबळ उडाली. तर दुसरीकडे संस्थांचे म्हणणे आहे की, हे कार्यकर्ते नागनाथाचे दर्शन स्पेशल रांगेतून घेऊ देण्यासाठी वाद घालत होते. त्यांना मंदिर परिसरात कार्यरत असलेले काही सुरक्षारक्षक समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते तर या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत वाद घातला. आता या प्रकरणात गुन्हा तर दाखल झाला आहे, मात्र खरे कारण काय आहे हे? पोलीस तपासात उघड झाल्यानंतर पुन्हा हे संस्थान चर्चेला येण्याची शक्यता आहे.