हिंगोली- पंढरपूरच्या वारीसाठी गेलेल्या भाविकांची वारी संत नामदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे परतवारीला नरसी नामदेव येथे चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यामुळे ही पावन भूमी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संत नामदेवांनी वस्त्र समाधी घेतली आहे. तर पंढरपूर येथे संत नामदेवांसह त्यांच्या कुटुंबियांनी समाधी घेतलेली आहे. म्हणूनच या पावन भूमीला प्रतिपंढरपूर असे म्हटले जाते.
परतवारीच्या दिवशी हा परिसर अक्षरशः भाविकांच्या मांदियाळीने फुलून निघतो. येथे आलेल्या सर्वच भाविकांच्या भोजनाची व्यवस्था ही मंदिर संस्थानच्यावतीने केली जाते. दरवर्षी परतवारीच्या निमित्ताने विविध गावांमधून पंढरीला गेलेल्या दिंड्या नरसी नामदेव येथे दाखल होतात. दरवर्षी या भूमीत चार ते पाच लाखांच्यावर भाविकांची मांदियाळी परतवारीच्या दिवशी दिसून येते. या ठिकाणी चार समाधीपैकी एक असलेली वस्त्र समाधी ही नामदेव महाराजांनी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातुन जेवढे भाविक, दिंड्या पंढरपूरला जातात त्या दिंड्याचा पावन भूमीत एक दिवस मुक्काम असतो.
पंढरपूरच्या वारीसाठी गेलेल्या भाविकांची वारी संत नामदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही परतवारीला जवळपास चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावत असल्याने, येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे दर्शन होईल अशी व्यवस्था मंदिर संस्थानच्या वतीने केली जाते. एवढेच नव्हे तर परिसरातील अनेक जण या महत्वाच्या दिवशी आप आपल्या परीने येथे येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करतात. आता एका दिवसांवर आषाढी एकादशी अन् या दिवसापासून पंधरा दिवसांवर परतवारी असल्याने, मंदिर परिसरात भाविकांसाठी स्वच्छता, साफसफाई करणे सुरू आहे.
सध्या संत नामदेवाच्या मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार सुरू आहे. या मंदिरावर गुजरातमधील कारागीर दिवस-रात्र राबत असून हे मंदिर अतिशय आकर्षक बनविले जात आहे. तसेच मंदिरात एक नव्याने उभारण्यात आलेली संत नामदेवाची पूर्णाकृती मुर्ती येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांचे पारणेच फेडत आहे. सोबतच मंदिराचे होणारे नक्षीकाम भाविकांच्या नजरा खिळून घेत आहे. तर मंदिरात बाराही महिने विनाधारक तैनात असून, 72 गावातील वयोवृद्ध विना हातात घेऊन येथील कार्यक्रमात सहभागी होतात. काही वयोवृद्ध तर पाच पाच वर्षांपासून मंदिरात विना घेऊ उभे राहत आहेत.
पूर्वी या ठिकाणी केवळ एकच मंदिर होते. मात्र, आता या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने पूर्णता कायापालटच झाला आहे. परत वारीला पूर्वीप्रमाणेच दरवर्षीच भाविकांची गर्दी होते. दाखल झालेल्या दिंड्या संत नामदेवाच्या अभंगवाणीने अन भजन कीर्तनाने हा परिसर न्हाहुन निघतो. या भागात भक्तिमय वातावरण निर्माण होत असल्याने, या वातावरणात सहभागी होण्यासाठी आवर्जून परिसरातील भक्तगण हजेरी लावतात. दर्शनाला अल्यांनंतर जो आनंद मिळतो त्याची शब्दात देखील तुलना करता येत नसल्याचे भाविक सांगतात. एवढेच नव्हे तर मनाला कधी एकटेपण वाटले तर मंदिर परिसरात येऊन फेरफटका मारणारे देखील भाविक मोठ्या प्रमाणात आहेत.