हिंगोली - दिवसेंदिवस पिक कर्ज देण्यासाठी बँका कानकूस करताना दिसत आहेत. ज्याला खरोखरच पीक कर्ज पाहिजे त्याला वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून, पीक कर्जपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजूनही अनेक शेतकरी पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकेत खेटे घेत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने पीक कर्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार वसमत येथील युनियन बँकेत उघडकीस आला. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण तेरा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कनीराम नामदेवराव राठोड(रा. चोंढी) यांचा ४ जून २०१५ रोजी मृत्यू झालेला आहे. मात्र, राठोड यांच्या नावे असलेल्या गट क्रमांक 135 मधील 1 हेक्टर 68 आर, या शेत जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून, मृत राठोड यांच्या कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता एक लाख पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले गेले आहे. ही बाब माहिती अधिकारी कार्यकर्ता नदाफ एम बशीर यांनी केलेल्या अर्जात उघड झाली आहे.
अनेक वेळा दिलेल्या तक्रारीकडे केले जात होते दुर्लक्ष -
नदाफ एम बशीर यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी अनेक वेळा तक्रार केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नदाफ यांनी परत पुराव्यासह तक्रार दाखल केली. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या नावे बँकेत खाते उघडल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे बँकेच्या सर्व नियमांची पूर्तता करून खाते उघडले गेले आहे.