हिंगोली - जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी शेताला भेट दिल्यानंतर सखाराम बुचके या शेतकऱ्याने आपल्या अडचणीचा पाढा वाचला. कंपनीचे न उगवलले बियाणे, पाऊस सुरू असल्याने पिकाची खुंटलेली वाढ अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून घेत गायकवाड यांनी शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.
हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ह्या हिंगोली दौऱ्यावर आल्या असून त्यांनी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेचा आढावा घेतला. सोबतच त्यांनी पीक कर्जाचादेखील आढावा घेतला. जिल्ह्यातील बँकांनी केवळ 18 टक्के पीक कर्ज वाटप केल्याचे निर्दशनास येताच त्यांनी बँक व्यवस्थापकास धारेवर धरले. गायकवाड यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गायकवाड यांनी बियाणे उगवण न झालेल्या अन पावसाने रखडून गेलेल्या खरीप पिकांची पाहणी केली. त्यांनी वसमत तालुक्यातील चोंढी शहापूर येथील शेतकरी सखाराम बुचके यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. दरम्यान, बुचके या शेतकऱ्यांने पालकमंत्र्यांसमोर अडचणींचा पाढा वाचला.
पीक हातचे गेले आहे, त्यामुळे परिस्थितीसमोर मी हतबल झालो असल्याचे बुचके यांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्री गायकवाड यांनी बुचके यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले. तसेच ज्या कंपनीचे बियाणे आहे, त्या कंपनीवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही गायकवाड यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिले आहेत.
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांवर बुचके यांच्यासारखी परिस्थिती येऊन ठेपली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. यावेळी पालकमंत्री गायकवाड यांच्या सोबत खा. राजीव सातव, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि. प. सीईओ राधा बिनोद शर्मा आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफा उपस्थित होता.