हिंगोली- जिल्ह्यातील वसमत येथील गोल्डन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सीताराम म्यानेवार असे या नगरसेवकचे नाव आहे.
नगरसेवक म्यानेवार हे शुक्रवारी रात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान नांदेड वरून (एम एच ३८ -७१४६) या क्रमांकाच्या कारने वसमतकडे येत होते. दरम्यान, टाकळगाव येथे त्यांची कार अडवून, त्यांना कारचा दरवाजा उघडण्यासाठी चोरटे इशारा करत होते. नगरसेवक कारचा दरवाजा उघडत नसल्याने दरोडेखोरांनी समोरील काच फोडली. तेव्हा नगरसेवकांनी कारचा दरवाजा उघडताच चोरट्यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवला. व त्यांच्याकडील ४ लाख २० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी पळविली.