हिंगोली- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार शहरी भागानंतर ग्रामीण भागात होत आहे. तालुक्यातील पहेनी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सोमवारी आला होता. त्यानंतर याच गावातील एका 11 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावात सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आलीय.
हिंगोलीतील पहेनी गावात महिलेपाठोपाठ 11वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ
परजिल्ह्यातून गावामध्ये परतलेल्या व्यक्तींना पहेनी ग्रामस्थांनी शाळेत क्वारंटाइन केले होते. त्यामधील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. यानंतर 11वर्षीय मुलाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, औरंगाबाद येथून आपापल्या गावी परतणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचप्रमाणे हिंगोली तालुक्यातील पहेनी येथे देखील मुंबईवरुन मोठ्या प्रमाणात लोक दाखल झाले आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन केलेय. यातील दोघांना सर्दीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील एका महिलेचे अन 11 वर्षीय मुलाचे स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविले होते.सोमवारी एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता यानंतर मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाबाधित महिला आणि 11 वर्षीय मुलगा या दोघांनाही विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. पहेनी या गावात आरोग्य विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. गाव सील करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आता हिंगोली जिल्ह्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 161 वर पोहोचली असून 90 जण बरे झाले आहेत, त्याना सुट्टी देखील देण्यात आली आहे. 71 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हिंगोलीकरांची चिंता वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढल्याने, पेरणीच्या वेळी मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.