हिंगोली- कोरोना विषाणूमुळे जगाला मोठा हादरा बसला आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढतच चालले आहेत. या विषाणूला अडकाव करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, पोलीस आणि सफाई कामगार जिवाची बाजी लावत आहेत. अशाच विदारक परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील वसमत येथे आपली दोन वर्षाची चिमुरडी सासूकडे ठेवून सफाई कामगार महिला कोरोनाला लढा देत आहे.
चिमुकलीला आजीकडे ठेवून महिला सफाई कामगार देत आहे कोरोनाला लढा पूजा बळवंत असे या महिलेचे नाव आहे. पूजा या वसमत येथील अण्णाभाऊ साठेनगर येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून त्या मिळेल ते काम करून आपला संसार चालवतात. आपणही कसे कुणाच्या जिवावर खावे, हा एकमेव विचार डोक्यामध्ये आणून पूजा या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून रुजू झाल्या आहेत. कोरोनाची भीती न बाळगता घरचे कामे करून त्या पहाटे पाच वाजता इतर सफाई कामगार महिलांसोबत कामावर हजर राहतात. पूजा या आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला आपल्या सासूबाईकडे ठेवून कोरोनाला लढा देत आहेत.
माझ्या अंगावर चिमुकली असल्याने ती मला सोडून अजिबात रहात नाही. कामावर जात असताना अंगाला बिलगते. एवढेच काय तर, बाहेर कोरोना असल्याचेही चिमुकली सांगते, मात्र आज कोरोनाला हरवण्यासाठी शासनाला माझी गरज आहे. कोरोनाला हरवल्यानंतर आपण सर्व सुखीच राहणार आहोत, त्यामुळेच हृदयावर हात ठेवून काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून काही वेळ अलग करून मी काम करते, अशी भावना पूजा यांनी व्यक्त केली.
कामावर पुजाला तिचे सहकारीही चांगलेच सहकार्य करीत असतात. पूजासोबत काम करत असलेल्या इतर तीन ते चार महिलांची स्थिती देखील बेताची आहे. आज नाही तर मग कधी, सर्वांचे कंबरडे मोडणाऱ्या कोरोनाला हरवायचे असेल तर सर्वांनी जिद्दीने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे केल्यास एक दिवस कोरोनाचा नायनाट होईल, असेही पूजाने सांगितले. कोरोना संकटात मुलीची व स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पूजा शहरात साफसफाईचे काम करत आहे. तिच्या जिद्दीला, हिम्मतीला 'ईटीव्ही भारत' चा सलाम.
हेही वाचा-'15 जूनला शाळा सुरू करण्याचा मानस, शाळांनी पालकांकडे 'फी'साठी तगादा लावल्यास कारवाई'