गोंदिया- महाराष्ट्र राज्य विना अनुदानित व उच्च माध्यमिक कृती समितीच्या वतीने विना अनुदानित शाळांना कायम करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षक, कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, या मागणीसह मुंबई येथील आझाद मैदानावर समितीच्या वतीने ६ ऑगस्टपासून बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र, या मागण्या तत्काळ पूर्ण व्हाव्या यासाठी दोन शिक्षकांनी झाडावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
अनुदानाची घोषणा आणि त्यासंबंधी शासन निर्णय निर्गमित होत नाही. तसेच विना अनुदानित शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होत नाही. तोपर्यंत जिल्ह्यातील एकही शाळा उघडणार नसल्याचे समितीने सांगितले आहे. याकरिता ९ ऑगस्टपासून जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेसमोर विना अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या माध्यमातून विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहेत.
आज १७ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या मंडपात आंदोलन सुरू होते. दरम्यान, दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या झाडावर सालेकसा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक एन. सी. मच्छीरके आणि सचिन कनिष्ठ महाविद्यालय पाटेकुर्राचे प्राध्यापक भास्कर लांजेवार झाडावर चढले. त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतला. या दोघांनी झाडावरुन खाली उडी मारण्याचा देखील प्रयत्न केला.
याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळावर पोहोचले. त्यांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु, मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलाश बोरकर यांनी मध्यस्ती करून माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास हे दोन्ही शिक्षक खाली उतरले.