गोंदिया - ग्रीन झोन असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील ३० दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून न आल्याने जिल्ह्यात असलेल्या विविध दुकानांना काही तास उघडे ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली होती. मात्र, बाजारपेठेत वाढत असलेली गर्दी पाहता दुकानदारांना दुकाने उघडण्याकरता ठराविक वेळ देण्यात आली आहे. यामध्ये नित्योपयोगी तसेच विविध दुकानांना सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर, देशी व विदेशी दारुच्या दुकानांना आणखी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे, ही दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, गोंदिया शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळ पासूनच वर्दळ पाहावयास मिळत असली तरीही अनेक दुकानात ग्राहक नसल्यामुळे विक्रेत्यांची चिंता वाढली आहे.
गोंदिया जिल्ह्यात दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी जिल्ह्यात सध्या कोरनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी कादंबरी बालकवडे यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी कार्यालये, केश कर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर, टॅक्सी, कॅब, ऑटो, रिक्षा व सायकल रिक्षांना तसेच उपहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट व ज्यूस सेंटर यांना अटी व शर्तीवर आणि वेळेचे बंधन घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
यामध्ये, सोशल डिस्टन्स, सर्व कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर करणे, हॅन्ड वॉश स्टेशन व सॅनिटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, सर्व केश कर्तनालये, सलून व ब्युटी पार्लर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजता दरम्यानच्या कालावधीत सुरू असतील. सोशल डिस्टन्ससह, वापरात येणारे सर्व साहित्य व इतर बाबी प्रत्येक वापरानंतर निर्जंतुक करणे आवश्यक आहे. दुकानाच्या आत गर्दी होणार नाही याची जबाबदारी दुकानदाराची असेल. गर्दी रोखण्यासाठी बाहेर खुणा करणे व टोकन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. दोन खुर्च्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे, केश कर्तनालयात एका ग्राहकास वापरण्यात आलेले कापड, टॉवेल व रुमाल इत्यादींचा पुन्हा वापर करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्राहकांनी स्वत:च आणावे टॉवेल -
केश कर्तनालय, सलूनमध्ये जातांना ग्राहकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वत:च घरुन टॉवेल, कापड व रुमाल सोबत आणावे. अशा सूचना सुध्दा जिल्हा प्रशासनाने केल्या आहे. केश कर्तनालयात येणाऱ्या ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक व पत्ता नोंदवण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. ती अद्यावत ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित आस्थापना धारकाची असणार आहे. केवळ पार्सल सुविधेची मुभा उपाहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट व ज्यूस सेंटर या आस्थापनामधून पार्सल सुविधा, घरपोच सुविधा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु बैठक व्यवस्थेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ सेवनास या आस्थापनामध्ये बंदी करण्यात आली आहे. ग्राहक खाद्यपदार्थ खरेदी करू शकेल व घरपोच सुविधा असेल पण त्या आस्थापनांमध्ये खाद्यपदार्थ खाण्यास मनाई करण्यात आली आहे.