गोंदिया- आरोग्य विभागातील १०२ रूग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहनचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या वाहनचालकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी घडली असून प्रेमभाऊ पिकलमुंडे असे मृत वाहनचालकाचे नाव आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कन्नाटी कंपनीने वाहचालकांच्या मागण्यांना पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले आहे.
प्रेमभाऊ पिकलमुंडे हे भंडारा जिल्ह्यातील धोप येथील रहिवासी होते. ते मुंडीकोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनचालक म्हणून कार्यरत होते. गर्भवती महिला व लहान मुलांना रूग्णसेवा देता यावी यासाठी आरोग्य विभागाकडून १०२ रूग्णवाहिका सेवा पुरविली जाते. शासनाने रुगवाहिकेची सेवा पुरवण्याचे कंत्राट मध्यप्रदेश राज्यातील भोपाल येथील अश्कोम मीडिया प्रा. लिमिटेड या कंपनीला दिला आहे. मात्र, सदर कंपनी रुग्णवाहिका चालकांना वेळेवर व नियमानुसार वेतन देत नाही. त्यामुळे, जिल्ह्यातील ७८ रूग्णवाहिकांच्या चालकांनी १८ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलनाला सुरवात केली. या आंदोलनाला आठवडा लोटूनही कोणताही तोडगा निघाला नसल्याने वाहनचालकांनी आंदोलन सुरूच ठेवले.