गोंदिया- प्रेमापोटी किंवा जिद्दीपुढे झुकत आपल्या अल्पवयीन अपत्यांना पालक वाहन देत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन वाहनचालकांची संख्या शहरात वाढत जात आहे. अशा अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतुक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली आहे. शाखेने १ नोव्हेंबरपासून मोहिमेला सुरूवात केली असून आतापर्यंत सुमारे ८० अल्पवयीन वाहन चालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
गोंदियात ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई; ४२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
वाहतूक नियंत्रण शाखेने सुमारे ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली असून या अंतर्गत वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालकांना सोडून त्यांच्या पालकांकडून दंड आकारण्यात आला. अशात आतापर्यंत ५४ पालकांना त्यांच्या अपत्यांच्या चुकीमुळे दंड भरावा लागला आहे. आतापर्यंत पालकांनी ४२ हजार ५०० रूपयांचा दंड भरला आहे.
विद्यार्थी शिक्षणाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. शाळेतील अभ्यास व त्यानंतर शिकवण्या अशा धावपळीत आजची पिढी अडकली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असून यातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ नसून रात्री ते फार थकून जातात. अशात आपल्या अपत्यांना थोडा आराम मिळावा या दृष्टीने पालक शाळा व शिकवण्यांसाठी त्यांना दुचाकी घेऊन देत आहेत. अशात मात्र एकाचे बघुन दुस-यालाही वाहन घेउन देण्याचे प्रकार एवढे वाढले आहे की, मोठ्यांच्या बरोबरीने आज अल्पवयीन मुले-मुली वाहन चालविताना दिसतात. विशेष म्हणजे आपल्या मुला-मुलीप्रती असलेल्या प्रेमातून तर काही ठिकाणी मुलांच्या हट्टामुळे पालक त्यांना वाहन घेऊन देत आहेत.ही अल्पवयीन मुले-मुली वेगाने वाहन चालवित असून यातुनच आता अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. या प्रकारावर आळा बसवण्यासाठी येथील वाहतुक नियंत्रण शाखेने याकरता मोहीम हाती घेतली आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासोबतच अल्पवयीनांवर कारवाई करण्यासाठी मोहीम छेडली आहे. वाहतुक नियंत्रण शाखेने १ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ६७५ वाहन चालकांवर कारवाया केल्या आहेत. त्यात १८ कारवाया वाहन परवाना नसलेल्यांच्या असून त्या सुमारे ८० कारवाया अल्पवयीन वाहनचालकांच्या आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २१ तर ट्रिपलसिट वाहन चालविणाऱ्यांच्या ८७ कारवाया आहेत. सध्या ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. मात्र, यात नक्कीच वाढ होणार यात शंका नाही.
वाहतुक नियंत्रण शाखेने सुमारे ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यांतर्गत वाहतुक पोलीस त्या अल्पवयीन वाहनचालकांना सोडून देतात व त्यांच्या पालकांना पाठविण्यास सांगतात. अशात आतापर्यंत ५४ पालकांना त्यांच्या अपत्यांच्या चुकीमुळे दंड भरावा लागला आहे. आतापर्यंत पालकांनी ४२ हजार ५०० रूपयांचा दंड भरला आहे. विशेष म्हणजे पालकांना बोलावून त्यांना आपल्या अल्पवयीन अपत्यांना वाहन देण्याचे दुष्परिणाम, भविष्यातील धोका याबाबत वाहतुक शाखेचे नियंत्रक निरीक्षक तावडे मार्गदर्शन करत आहेत.