गडचिरोली- आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधव, ओबीसी व इतर समाजाचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. मात्र, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही सरकारने समाजाच्या समस्यांना न्याय न दिल्याने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत 'नोटा'च्या माध्यमातून समाज बांधवांनी आपला रोष व्यक्त केल्याचे दिसून आले.
राज्यात सर्वाधिक गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात २४ हजार ५९९ मते 'नोटा'ला पडली आहेत. राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठे क्षेत्र म्हणून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची गणना होते. जवळपास ३०० किलोमीटर लांब हा लोकसभा मतदारसंघ आहे. या क्षेत्रात सर्वाधिक आदिवासी नागरिक असल्याने हा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. २००९ ला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हा काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर, २०१४ मध्ये भाजपकडून अशोक नेते या क्षेत्रातून निवडून आले. मात्र, आजपर्यंत येथील आदिवासी, ओबीसी बांधवांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील आदिवासी, ओबीसी समाज बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी शासनाशी लढा देत आहेत.
जेष्ठ पत्रकार अनिल धामोडे यांची प्रतिक्रिया गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या २०१४ च्या निवडणुकीत 'नोटा'ला मतदान करण्याचा निर्णय येथील ओबीसी समाजाने घेतला होता. त्यावेळेस जवळपास २४ ते २५ हजार मते नोटाला पडली होती. १९ टक्के आरक्षण पूर्ववत न झाल्याने या निवडणुकीच्या वेळेसही ओबीसी समाजाचा रोष कायम होता. त्यामुळे काही ठिकाणी ओबीसी समाज बांधवांनी मतदानावर बहिष्कारही टाकला. तर, काहींनी 'नोटा'ला पसंती दिली. तर येथील आदिवासी बांधवांचे प्रश्नही अनेक वर्षांपासून रेंगाळलेले आहेत. तसेच येथील ग्रामसभांच्या अधिकारावर केंद्र व राज्य शासनाच्या कायद्यामुळे गदा आली आहे. त्यामुळे ग्रामसभांनीही रोष व्यक्त करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराकडून ग्रामसभांची मनधरणी करण्यात आली होती. त्यानंतरही गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात २४ हजार ५९९ इतके नोटाला मतदान झाले.
यामध्ये सर्वाधिक ६९८३ मतदान अहेरी विधानसभा क्षेत्रात झाले आहे. त्यापाठोपाठ गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही ५२६३, आरमोरी विधानसभा क्षेत्रात ४११४ इतके मतदान 'नोटा'ला पडले आहे. तर, आमगाव क्षेत्रातून २५५०, ब्रह्मपुरी २५२१ आणि चिमूर विधानसभा क्षेत्रातून २९८७ इतके नोटाला मतदान झाले. ओबीसी समाज बांधवांची संख्या गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक आहे. मात्र, सर्वाधिक नोटाला मतदान अहेरी विधानसभा क्षेत्रात झाले. अहेरी विधानसभा क्षेत्रात जवळपास ७० टक्के नागरिक अनुसूचित जमातीचे आहेत. त्यामुळे येथील ग्रामसभा व आदिवासी नागरिकांनीच काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांना नापसंती दर्शवत नोटाला मतदान केल्याचे निकालानंतर समोर आले आहे.