गडचिरोली- येथील अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक (नक्षल सेल) डॉ. हरी बालाजी या दोन आयपीएस अधिकाऱ्यांची राज्य शासनाने बदली केली. त्यांच्या जागी पदोन्नतीने मनीष कलवानिया व राज्य राखीव पोलीस बल देसाईगंज वडसा येथे समादेशक म्हणून बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर रुजू होणार आहेत.
गडचिरोलीतील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक (नक्षल सेल) डॉ. हरी बालाजी या दोन आयपीएस अधिकाऱ्यांची राज्य शासनाने बदली केली.
गडचिरोली पोलीस मुख्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) म्हणून महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक (नक्षल सेल) म्हणून डॉ. हरी बालाजी चार वर्षांपूर्वी रुजू झाले होते. त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्याने वरिष्ठ समय श्रेणीमध्ये पदोन्नती देऊन राज्य शासनाच्या गृह विभागाने त्यांची बदली केली आहे. महेंद्र पंडित यांची नंदुरबार येथे पोलीस अधीक्षक म्हणून तर डॉ. हरी बालाजी यांची अमरावती ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. या दोन्ही आयपीएस अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील नक्षल कारवायांवर अंकुश घालण्यात पोलीस दलाला मोठे यश आले.
गतवर्षी एप्रिल महिन्यात भामरागड तालुक्यातील कसनसूर-बोरीया जंगलात झालेल्या चकमकीत तब्बल 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश आले होते. या चकमकीची व्यूहरचना आखण्यात या दोन्ही आयपीएस अधिकाऱ्यांचा मोठा हात होता. मात्र, त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांना पदोन्नती देत पोलीस अधीक्षक म्हणून इतर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तसा आदेश 15 जुलैला गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी निर्गमित केला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या जागी नविन अधिकारी लवकरच सुरू होतील. जिल्ह्यातील नक्षली कारवाया रोखण्यासाठी चांगले काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.