गडचिरोली - कुरखेडा येथील पोलिसांनी कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक पकडून त्यातील ३७ जनावरांची सुटका केली. याप्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. भूषण ओमकार तरारे (३१, रा. कामठी, नागपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
परिवहन विभागातील मोटर वाहन निरीक्षकाची कारवाई
गडचिरोली येथील प्रादेशिक परिवहन विभागातील मोटर वाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर हे कुरखेडा परिसरात गस्तीवर होते. गुरुवारी सकाळी त्यांना गोठणगाव टी-पाइटकडून कुरखेडाकडे एक दहाचाकी ट्रक संशयास्पदरित्या येताना दिसला. तेव्हा ट्रकची तपासणी केली असता त्यात गोवंश असल्याचे आढळले. त्यानंतर कुरखेडाचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व वाहतूक हवालदार विलास शेडमाके घटनास्थळी दाखल झाले.
३७ जिवंत जनावरांची सुटका
ट्रकमध्ये पांढऱ्या रंगाचे ९ गोऱ्हे, लाल रंगाचे १८ गोऱ्हे, काळ्या रंगाचे १० गोऱ्हे असे एकूण ३७ जिवंत व दोन मृत गोऱ्हे आढळून आले. या गोवंशाची किंमत प्रत्येकी १० हजार याप्रमाणे ३ लाख ९० रुपये एवढी आहे. पोलिसांनी जिवंत गोवंशाची सुटका करुन ७ लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त केला. ट्रकचालक भूषण तरारे यास अटक करण्यात आली आहे. सर्व जिवंत गोवंशाची रवानगी गोठणगाव येथील गोशाळेत करण्यात आली आहे.