गडचिरोली- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील सावंगी आणि आमगाव या गावांना भेट देत त्यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य शासनाचे विदर्भाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत राहतील, आधी पूरग्रस्तांना मदत द्या, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.
नुकत्याच झालेल्या गोसेखुर्द धरणाच्या विसर्गाने पूर्व विदर्भातील ५ जिल्ह्यांमध्ये मोठा पूर आला. त्यामुळे या पाचही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी सावंगी-आमगाव ही गावे वसलेली आहेत. या दोन्ही गावांना पुराचा फटका बसला आहे. या पूरग्रस्त गावांमधील सद्यस्थितीचा फडणवीस यांनी आढावा घेतला.
दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्तांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पूरग्रस्तांची विविध निवेदने स्वीकारत फडणवीस यांनी राज्य शासनावर टीका केली. मोठे संकट असताना तत्काळ प्रतिसाद हवा होता. मात्र, प्रशासन सतर्क न झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे फडणवीस म्हणाले. पूरग्रस्तांना तातडीने रोखीने मदत करा. पंचनामे होण्याआधी अशा पद्धतीने रोखीची मदत करता येते, याकडे लक्ष वेधताना त्यांनी प्रशासनाने संथगती दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.