गडचिरोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एसटीची चाके थांबली आहेत. सध्या एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. याचा परिणाम एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होत असून थकीत वेतनामुळे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून वेतन देण्यासाठी साकडे घातले आहे.
थकीत वेतनामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे हाल ; कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे थकीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे मोठे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
या वर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यातील एसटी बसची चाके कोरोनामुळे थांबली आहेत. मार्च महिन्यापासून राज्य सरकारचे महामंडळ असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनियमितता आली आहे. काही महिन्यात 25 टक्के तर जून-जुलै या महिन्यातील 100 टक्के वेतन रखडलेले आहे. अशा स्थितीत एसटी कर्मचार्यांच्या कुटुंबीयांचे मात्र हाल होत आहेत. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने गडचिरोलीत एसटी कामगार व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून कर्मचारी व कुटुंबीयांचे हाल थांबवण्याची विनंती केली.
एसटीला राज्य सरकारी सेवेत सामावून घेत त्यांचे वेतन नियमित करावे, असा आग्रह कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. राज्यात आणीबाणीच्या प्रत्येक प्रसंगात एसटीनेच राज्य शासनाला मदत केली आहे. त्यामुळे एकीकडे आणीबाणीच्या प्रसंगी एसटीला मदत मागायची आणि दुसरीकडे संकटाच्या समयी एसटीकडे दुर्लक्ष करायचे, अशी भावना एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यामुळेच हे सर्व टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.